रामेश्वर गावचे ‘डॅशिंग’ नेतृत्व- विनोद सुके

संकलन : साईनाथ गावकर
शिवकालीन श्री देव रामेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेले देवगड तालुक्यातील रामेश्वर हे गाव. खरं तर, रिफायनरी प्रकल्पाबाबत सुरुवातीपासून विरोधात असलेल्या रामेश्वर गावाने आपल्या हक्कांसाठी विनोद सुके नावाचा हक्काचा शिलेदार गावाच्या सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजित केला. ह्या शिलेदाराने सुरुवातीपासूनच आपल्या डॅशिंग स्वभावानुसार रिफायनरी विरोधातील लढ्यात महत्वपूर्ण योगदान देत गावातील जनतेच्या मनावर कायमस्वरूपासाठी अधिराज्य गाजविले आहे. २०१८ च्या निवडणुकीत रामेश्वर गावात प्रथमच थेट सरपंचपदी विराजमान झाले.  विनोद विजयानंद सुके हे डॅशिंग नेतृत्वामुळेच रामेश्वरवासीयांचा भक्कम आधारस्तंभ बनले आहेत.

जवळपास २००० पेक्षा अधिक लोकवस्ती असलेला ९ वाड्यांचा रामेश्वर गाव. रामेश्वर गावात २०१८ साली सरपंचपदाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सरपंचपदाची ही निवडणूक त्रिशंकू झाली. निवडणूक त्रिशंकू जरी झाली असली तरी विनोद सुके हे बहुमताने निवडून आलेत. आता त्यांच्या सरपंचपदाच्या कालावधीला २ वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. अगदी सुरुवातीलाच रामेश्वर गावात रिफायनरी प्रकल्पाच्या घोंगावणाऱ्या वादळामध्ये आंदोलने, रास्ता रोको आदींमुळे आणि त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे गावात म्हणावे तेवढे आणि स्वतःला स्वतःकडून अपेक्षित असलेले काम करता आले नाही याची खंत मनाशी असल्याची भावुक प्रतिक्रिया विनोद सुके यांनी सुरुवातीलाच बोलताना व्यक्त केली. तरीही जे जे शक्य झाले ते ते सर्व काही गावातील जनतेसाठी करायला मिळाले, याचे समाधानही मनाशी असल्याचे त्यांनी सांगितले.

रिफायनरी विरोधातील लढ्यात अग्रेसर भूमिका-
विनोद सुके यांनी अगदी सुरुवातीपासूनच रिफायनरी विरोधातील लढ्यात अग्रेसर भूमिका घेतलेली. कुणालाही थेट भिडण्याची हिंमत ठेवणाऱ्या विनोद सुके यांनी गावातील जनतेच्या जोरावर रिफायनरीला कडाडून विरोध केला. हा लढा देत असताना त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. पण गावातील जनता जनार्दनाच्या विश्वासामुळेच मी सरपंचपदाच्या खुर्चीवर बसू शकलो. त्यामुळे रिफायनरीला या पूर्वी माझा विरोध होता, आजही आहे आणि पुढेही राहील असे विनोद सुके ठणकावून सांगतात. रिफायनरीला संपूर्ण रामेश्वर गावाचा विरोध असून मी जनतेसोबतच आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

ग्रामसभा यशस्वी करणारे सरपंच-
खरं तर, गावाच्या विकासात ग्रामसभांचे स्थान महत्वपूर्ण आहे. पण काही गावांमध्ये ग्रामसभांना फारच कमी ग्रामस्थ उपस्थित असतात. रामेश्वर गावात मात्र ग्रामसभा यशस्वीपणे भरवल्या  जातात. याबाबत आपण नेमका कोणता ‘फ़ंडा’ वापरता? असा प्रश्न प्रस्तुत प्रतिनिधीने केला असता ते म्हणाले, केवळ नोटीस बोर्डवर प्रसिद्धी पत्रक चिकटवून ग्रामस्थ ग्रामसभांना येत नसतात. त्यासाठी गावात रिक्षा फिरवून स्पीकर अनाऊसिंग केले जाते. ग्रामसभांना ग्रामस्थांनी उपस्थित राहिले पाहिजे, यासाठी त्यांच्या हीताचा आणि फायद्याचा एखादा आकर्षक मुद्दा अजेंड्यात ठेवला जातो. साहजिकच ग्रामपंचायत आमच्यासाठी काहीतरी नवीन योजना घेऊन आली आहे, ही नेमकी योजना काय आहे? हे जाणून घेण्यासाठी ग्रामस्थ ग्रामसभांना मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. ग्रामस्थ कसे सक्षम होतील? असे मुद्दे ठेवले की आपोआप ग्रामसभांना गर्दी होते, असे विनोद सुके यांनी सांगितले. ज्या सरपंचाला माहिती आहे  की निधी कुठल्या विभागात आहे, तोच सरपंच गावाचा विकास करू शकतो, असे उदबोधक बोलही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शासनाच्या योजना गावात पोहचविण्याचे काम-
शासकीयस्तरावर जाहीर होत असलेल्या सर्वच योजना ग्रामीण भागातील जनतेला माहिती नसतात. त्यासाठी आपल्यालाच थेट जनतेपर्यंत जात या योजना पोहचवाव्या लागतात. यासाठीच गावात विधवा महिला, तसेच ज्यांचे कुणी नाही अशा ग्रामस्थांचा सर्व्हे सुरू केला. या सर्वेतून आजपर्यंत ९ ग्रामस्थांना पेन्शन योजना सुरू करून दिल्या आहेत. अपंगांचा सर्व्हे करून त्यांच्यासाठी विविध योजना अंमलात आणण्याबरोबरच पेन्शनही सुरू करून दिले. आतापर्यंत गावातील ५ अपंगांना ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो. प्रधानमंत्री पेन्शन योजनेतून २६० लोकांचे फॉर्म भरून ही योजना जनतेपर्यंत पोहचवू शकलो, याचे समाधान नेहमीच मनाकडे आहे, असे सरपंच विनोद सुके यांनी सांगितले.

दुग्धव्यवसायात भरीव कामगिरी-
सरपंच विनोद सुके हे लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरत असतानाच रोजगाराचे साधन म्हणून दुग्धव्यवसायात त्यांनी भरीव कामगिरी करून दाखविली आहे. विनोद सुके यांच्याकडे आजच्या घडीला ३५ म्हैशी आहेत. यांच्या माध्यमातून दिवसाला सुमारे ४० लीटर दूध मिळते. गावातील लोकांनी देखील कुक्कुटपालन, शेळीपालन अशा प्रकारच्या शेती पूरक व्यवसायांकडे वळावे असे आवाहन कोकण नाऊच्या  माध्यमातून मी करतोय असे त्यांनी सांगितले. गावातील  लोकांना शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे यासाठी गावात पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून कोंबडीच्या १४०० पिल्लांचे वाटप केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जनतेसाठी आलेला निधी, थेट जनतेच्या खात्यात-
सरपंच विनोद सुके यांनी ग्रामपंचायतीकडे जनतेसाठी आलेला निधी थेट जनतेच्या बँक खात्यात जावा या उद्देशाने ग्रामस्थांची बैठक घेत त्यांना एकत्र केले. मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी १५ टक्के ग्रामनिधी खर्च होणार होता. त्यावेळी सर्वांची बैठक घेऊन त्या निधीतून कुणाला काय काय अपेक्षित आहे हे विचारले गेले आणि थेट निधी जनतेपर्यंत पोहचवून जनतेचे हित साधण्याचे काम केले.

कोरोनाला ठेवले वेशीबाहेर-
कोरोना महामारीच्या संकटात रामेश्वर गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. गावात मास्क, सॅनिटायझर वाटप केले. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप केले. गावात कोरोना योद्धा कमिटी स्थापन करून या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाला गावाच्या वेशीबाहेर ठेवण्यात आम्ही यश मिळविले असे विनोद सुके यांनी सांगितले. या कमिटीमध्ये सरपंच विनोद सुके, उपसरपंच विल्यम फर्नांडिस, सदस्य- अजित पुजारे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पुजारे, माजी सरपंच निलिनी गिरकर, मरिना विल्सन फर्नांडिस, प्रकाश पुजारे, संदीप पुजारे, हरिश्चंद्र ठुकरुल, नासिर मुकादम, सुरेश केळकर, अशोक आदम आदी होते.

विविध सामाजिक कामे-
सरपंच विनोद सुके यांनी विविध सामाजिक कामे करत सरपंचपद हे जनतेच्या हितासाठीच असते हे सिद्ध करून दाखवले आहे. विनोद सुके यांनी वेळप्रसंगी स्वतः रस्त्यावर उतरवून रस्त्यावरील खड्डे बुजविले आहेत. गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजीपाला स्पर्धा घेतली. स्वच्छता अभियान राबविले. विविध आरोग्य शिबीरे घेतली. १४ व्या वित्त आयोगातून गावातील ४५ महिलांना फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण दिले. यांसारखी अनेक विविध सामाजिक कामे सरपंच विनोद सुके यांनी गावात केली आहेत.

आमदार नितेश राणेंची महत्वपूर्ण साथ-
गावाचा सर्वांगीण विकास साधण्यात आमदार नितेश राणे यांची तितकीच महत्वपूर्ण साथ लाभली असल्याचे यावेळी सरपंच विनोद सुके यांनी आवर्जून सांगितले. आमदार नितेश राणे यांच्या स्वनिधीतून गावातील पाणी टंचाई कमी होण्यासाठी काटे आदमवटार व कोलवाडी बाईतवटार या २ ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आली. त्यामुळे गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यात हातभार लागला. तसेच आमदार निधीतून अनपूर डांबरीकरण रस्ता केला गेला. बालकल्याणमधून कोलवाडी येथे अंगणवाडी, खवशी येथे जेटी बांधली. तसेच रामेश्वर गावात खारलँड बंधारा मंजूर करून घेत झडपे बसविण्यात आलीत, एकूणच आपल्या कार्यकाळात कित्येक वाड्यांमध्ये पायवाटा बांधून देता आल्यात, याचेही मनाकडे समाधान आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.​​


  अंक ४, आदर्श गाव – आदर्श सरपंच, ​रामेश्वर​.  ​​

Leave a Reply

%d bloggers like this: