ऍक्टिव्ह महिला सरपंच- सौ. राधिका गोपीनाथ गुरव

संकलन : साईनाथ गावकर 
निसर्गाच्या कुशीत वसलेले देवगड तालुक्यातील पेंढरी हे गाव. जवळपास १००० लोकवस्ती असलेले हे गाव. लग्नागोदर सरपंच बनण्याचे स्वप्न पाहिलेल्या एका महिलेने आपले स्वप्न लग्नानंतर पेंढरी गावाचे सरपंचपद भूषवित  सत्यात उतरविले. सौ. राधिका गोपीनाथ गुरव यांनी सरपंचपदाचे स्वप्न केवळ सत्यात उतरवले एवढेच मर्यादित नाही तर सरपंचपदाला शोभणारी कामगिरी देखील त्यांनी करून दाखविली.

सौ. राधिका गोपीनाथ गुरव या लग्नापूर्वी मुंबईत वास्तव्यास होत्या. लग्न झाल्यानंतर संसारात रमतानाच ८ वर्षांनी त्या पेंढरी गावाच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या. पहिल्याच प्रयत्नात पेंढरीवासीयांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मताधिक्याने त्या पेंढरी गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. लग्नागोदर पाहिलेले स्वप्न सत्यात उतरण्याचे चित्र त्यांनी याची देही, याची डोळा पाहिले. सरपंच झाल्यानंतर गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सौ. राधिका गुरव यांनी अक्षरशः कंबर कसली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व देवगड पंचायत समिती भारतीय जनता पार्टीकडे असल्यामुळे गावाच्या विकासासाठी त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला आणि गावात विकास कामांचा ओघ सुरू झाला, असे ते आवर्जून सांगतात.

धरण बांधणे-
पेंढरी गावात छोटे धरण बांधले जावे ही पेंढरी गावातील ग्रामस्थांची कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. हे धरण पूर्ण झाल्यानंतर गावाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार होती तसेच शेतीला देखील मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा मिळणार होता. शेतकरी व एकूणच गावातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता पेंढरी गावात धरणाच्या बांधकामाचे काम सौ. राधिका गुरव यांनी पूर्ण केले. अर्थात या कामात त्यांना सर्वांचीच महत्वपूर्ण साथ लाभली, असे त्या सांगतात.

सुमारे १०५३ लोकसंख्या असलेल्या पेंढरी गावात सडेवाडी, मोगरेवाडी, घाडीवाडी, गावठाणवाडी, बौद्धवाडी, फणसाईवाडी, २ धनगरवाड्या अशा एकूण ८ वाड्या आहेत. प्रत्येक वाडीतील ग्रामस्थांपर्यंत सर्व प्रकारच्या सोई सुविधा पोहच होण्यासाठी सौ. राधिका गुरव प्रयत्नशील आहेत. पेंढरी प्राथमिक शाळेची दुरुस्ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून करून घेता आली याचे समाधान असल्याचे सौ. राधिका गुरव सांगतात.

पावसाळी दिवसात गावात कुणाचे निधन झाले तर ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल व्हायचे. पेंढरी स्मशानभूमीत भर पावसात भिजत उभे राहावे लागायचे. ग्रामस्थांचे होणारे हाल पाहून सौ. राधिका गुरव यांनी पेंढरी स्मशानभूमीची छत बांधणी करून घेतली. तसेच स्मशानकडे रस्ता जाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायवाट बांधून घेतली.

सुचविलेली कामे-
सरपंच सौ. राधिका गुरव यांनी फणसाईवाडी ते विजयदुर्ग मेन रोड, सडेवाडी ते गढिताम्हाणे जोडरस्ता, पेंढरी काठा ते विजयदुर्ग जोडरस्ता, वैभव घाडी घर ते विजयदुर्ग जोडरस्ता ही कामे एम. आर. जी. एस. मध्ये सुचविलेली आहेत. ही कामे लवकरच मंजूर होऊन पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.

पुढील काळात डुगाचा ओहोळ आणि गोठण येथील कोजवेवर जास्त उंचीचा वाहतूक पूल बांधन्याचा मानस आहे, असे सौ. राधिका गुरव आवर्जून सांगतात.

पतीची साथ महत्वपूर्ण-
गावाच्या सामाजिक कामात पती गोपीनाथ गणपत गुरव यांची महत्वपूर्ण साथ लाभली आहे. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच गावातील जनतेची पूर्णवेळ सेवा करता येत असल्याची प्रतिक्रिया सौ. राधिका गुरव यांनी बोलताना व्यक्त केली.

आ. नितेश राणेंचे सहकार्य लाभले-
आ.नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायची प्रत्येकाची ईच्छा असते. माझी ईच्छा पहिल्याच निवडणूकीत पूर्ण झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष रवी पाळेकर, तालुकाध्यक्ष संतोष किजवडेकर, वाघोटनचे सरपंच बाबा आमलोस्कर आदी सर्व ग्रामस्थ व सहकारी सदस्य यांच्या सहकार्य व मार्गदर्शनामुळे गावाची सेवा करण्याची  संधी मिळाली असून त्याचे निश्चितच सोने करणार अशी प्रतिक्रिया सौ. राधिका गुरव यांनी बोलताना व्यक्त केली.

ऍक्टिव्ह महिला सरपंच म्हणून सौ. राधिका गोपीनाथ गुरव यांचे देवगड तालुक्यात नाव घेतले जाते. सरपंचपदाच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोरोनाच्या संकटात गावात ४ वेळा निर्जंतुकिकरण फवारणी केली असून सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. त्यामुळे कोरोनाच्या संकट नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली, असेही त्यांनी ‘कोकण नाऊ मीडिया ग्रुप’शी बोलताना सांगितले.​​ 

अंक ४, आदर्श गाव – आदर्श सरपंच, ​पेंढरी​.   

Leave a Reply

%d bloggers like this: